Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमरावेरमध्ये दोन एकरात १७१ किलो गांजाची शेती उध्वस्त : रावेर पोलीसांचा धडक...

रावेरमध्ये दोन एकरात १७१ किलो गांजाची शेती उध्वस्त : रावेर पोलीसांचा धडक छापा

रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत दोन एकरांमधील तब्बल १७१ किलो वजनाची गांजाची शेती उध्वस्त केली आहे. ही कारवाई रावेर तालुक्यातील मोरव्हाळ शिवारात करण्यात आली असून, या प्रकरणी युसुफ अकबर तडवी (वय ५०, रा. मोरव्हाळ ता. रावेर) या शेतकऱ्यावर एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांना ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार तसेच फॉरेन्सिक पथकाने मोरव्हाळ शिवारातील संशयित शेतात छापा टाकला. तपासादरम्यान, आरोपी युसुफ अकबर तडवी याने आपल्या दोन एकर शेतात तुरीच्या पिकामध्ये लपवून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या ‘कॅनबिस’ वनस्पती (गांजा) सदृश अंमली पदार्थाची लागवड केल्याचे आढळले.

या ठिकाणी एकूण १७२ झाडे आढळून आली असून, त्यांचे एकत्रित वजन सुमारे १७१ किलो इतके निघाले आहे. पंचासमक्ष फॉरेन्सिक पथक व पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जागीच जप्त केला असून, जप्त केलेल्या गांजाचे बाजारमूल्य अंदाजे १७ लाख रुपये इतके असल्याचे समजते. सदर शेत हे अतिदुर्गम भागात असल्यामुळे पोलिसांनी सकाळी ८ वाजेपासून सुमारे तीन किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर ही यशस्वी कारवाई पार पडली.

या कारवाईसाठी मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (सो.), अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (सो.), तसेच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (सो.) यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडक कारवाई केली. या पथकात पोउपनिरीक्षक तुषार पाटील, पोउपनिरीक्षक मनोज महाजन, पोना कल्पेश आमोदकर, पोकाँ प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील, पोहेका ईश्वर चव्हाण, पोहेका जगदीश पाटील, पोकाँ इस्माईल तडवी, पोका गजानन बोणे, कुंदन नागमल, चालक पोहेकाँ गोपाळ पाटील यांचा समावेश होता.

रावेर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अंमली पदार्थांच्या अवैध शेतीविरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या