Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकायदेविषयक शिबिरातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश; विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचा निर्धार

कायदेविषयक शिबिरातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश; विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचा निर्धार

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे गुरुवारी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती घडविण्यात आली. ‘व्यसनाधीनतेचे जीवनातील दुष्परिणाम’ या विषयावर प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश दिला. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. व्यसनमुक्तीबाबत कायदेशीर आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी तसेच युवकांना व्यसनांच्या गर्तेत ओढले जाण्यापासून रोखण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वक्ते शशिकांत वारूळकर म्हणाले की, “तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात तब्बल साठ लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी 54 लाख लोक प्रत्यक्ष व्यसन करणारे असून सहा लाख लोक हे अप्रत्यक्षपणे या व्यसनांच्या संपर्कामुळे मृत्यूमुखी पडतात.” भारतात दरवर्षी सुमारे 13 लाख लोक व्यसनांमुळे मृत्यूमुखी पडतात, हे चिंताजनक असून 2030 पर्यंत हे प्रमाण 80 लाखांवर पोहोचण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भारत तंबाखू निर्मितीत तिसऱ्या क्रमांकावर असला तरी सेवनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वारूळकर पुढे म्हणाले की, “व्यसनातून बाहेर पडण्यासाठी ‘निकोटीन रिप्लेसमेंट’ साधनांचा वापर करावा, तसेच ‘ट्रिगर्स टाळा’ म्हणजे ज्या ठिकाणी व्यसनाची इच्छा निर्माण होते ती जागा आणि वेळ बदला. व्यसन करणाऱ्या मित्रांची संगत सोडा, सकारात्मक जीवनशैली अंगीकारा, चांगल्या सवयी आणि पुस्तकांचा सहवास ठेवा.” त्यांनी आणखी सांगितले की, भारतात व्यसनाधीन झालेल्या 88 टक्के लोकांनी किशोरवयातच व्यसनाची सुरुवात केलेली असते. त्यामुळे अशा तरुणांमध्ये जागृती निर्माण करणे हे काळाचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. डी. भाबड यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज न्हाळदे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे, आयसीटीसीचे समुपदेशक वसंत संदांशिव तसेच आयटीआयचे प्राचार्य टी. आर. पाटील, एस. बी. पाटील व इतर प्रशिक्षकांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले.

या कायदेविषयक शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश दिला गेला असून, जबाबदार आणि निरोगी समाज घडविण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या