Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याटोल नाक्यांवर स्थानिक आणि वार्षिक पासविषयी ३० दिवसांत फलक लावण्याचे निर्देश..!

टोल नाक्यांवर स्थानिक आणि वार्षिक पासविषयी ३० दिवसांत फलक लावण्याचे निर्देश..!

पासची वैधता एक वर्ष किंवा २०० टोल प्लाझा पार करेपर्यंत मर्यादित राहील.

पास राजमार्गयात्रा मोबाइल अ‍ॅपवरून ऑनलाईन खरेदी करता येतो आणि ₹३,००० या एकदाच आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर उपलब्ध आहे.

प्रवाशांसाठी दिलासा: टोल पासविषयी माहिती आता इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेत उपलब्ध.

मुंबई | वृत्तसेवा | पोलीस दक्षता लाईव्ह :- राष्ट्रीय महामार्गांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना स्थानिक मासिक पास आणि वार्षिक पास यांच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता व सुलभ माहिती मिळावी, या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील सर्व टोल नाक्यांवर या पासची सविस्तर माहिती ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाने आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ३० दिवसांच्या आत सर्व टोल प्लाझांवर माहितीफलक लावण्याचे आदेश दिले असून, हे फलक इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये असावेत, अशी सक्ती करण्यात आली आहे. संबंधित फलक दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा स्पष्टपणे वाचता येतील, याची खात्री करणे देखील बंधनकारक ठरविण्यात आले आहे.

सर्व टोलनाक्यांवर सविस्तर माहितीफलक…
या उपक्रमांतर्गत, टोल नाक्याचा प्रवेशमार्ग, ग्राहक सेवा केंद्रे आणि प्रवेश-निर्गमन बिंदू अशा ठिकाणी स्थानिक मासिक पास आणि वार्षिक पास यांची सर्व माहिती… दर, प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे.. ठळकपणे प्रदर्शित केली जाईल. याशिवाय हीच माहिती राजमार्गयात्रा या मोबाइल अनुप्रयोगावर आणि संबंधित NHAI प्रकल्पांच्या संकेतस्थळांवर देखील अपलोड करण्यात येईल, ज्यामुळे ही माहिती व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचेल.

स्थानिक मासिक पास ; स्थानिक प्रवाशांसाठी दिलासा..
‘स्थानिक मासिक पास’ ही सुविधा त्या खाजगी वाहनधारकांसाठी आहे जे संबंधित टोल प्लाझापासून २० किमीच्या परिसरात वास्तव्य करतात. या पासचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल

आधार कार्ड,
वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC),
निवासी पत्त्याचा पुरावा.

या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित पास टोलनाक्यांच्या मदतकक्षात (Help Desk) वितरित केले जातील.

वार्षिक पास ; देशभरातील टोल नाक्यांवर एकसंध सुविधा…
प्राधिकरणाने जाहीर केलेल्या ‘वार्षिक पास’ सुविधेनुसार, हा पास कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी वाहनांसाठी लागू आहे. याची वैधता एक वर्ष किंवा २०० टोल प्लाझा पार करेपर्यंत मर्यादित राहील. हा पास राजमार्गयात्रा मोबाइल अ‍ॅपवरून ऑनलाईन खरेदी करता येतो आणि ₹३,००० या एकदाच आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर उपलब्ध आहे.खरेदी केल्यानंतर तो संबंधित वाहनाच्या फास्टॅगवर डिजिटल स्वरूपात सक्रिय केला जाऊ शकतो. ‘वार्षिक पास’ हा देशभरातील सुमारे १,१५० टोल प्लाझा, म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर वैध राहील. त्यामुळे प्रवाशांना अनेक मार्गांवर सुलभ, अखंड आणि किफायतशीर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या