जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातील हद्दपार सराईत गुन्हेगार तेजस दिलीप सोनवणे यास दोन साथीदारांसह गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि धारदार कोयतासह जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश मिळाले आहे.
सदर गुन्हेगारास मा. उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग यांच्या आदेशानुसार दोन वर्षांच्या कालावधीसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, त्याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करत साथीदारांसह शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दि. २५ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील पो.उ.नि. राहुल तायडे, सफो विजसिंग पाटील, पोह. गणेश शिरसाळे, पोह. प्रमोद लाडवंजारी, पोह. किरण चौधरी, पो.कॉ. गणेश ठाकरे, पो.कॉ. किरण पाटील, पो.कॉ. नितीन ठाकूर, पो.का. राहुल घेटे, पो.कॉ. योगेश घुगे यांचे पथक नेमून तत्काळ कारवाईचे आदेश दिले.
पथकाने नेहरू नगर परिसरातील संदीपनी बॉईज हॉस्टेलजवळ सापळा रचून संशयास्पद हालचाल करणारे तिघे युवक ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर), खुशाल पितांबर सोनार (वय २१, रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर) आणि चेतन पितांबर सोनार (वय २३, रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर) अशी सांगितली.अंगझडतीत खुशाल सोनार याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस, तर चेतन सोनार याच्याकडून धारदार लोखंडी कोयता असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून तेजस सोनवणे शहरात आढळल्याने तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. सदर तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ७४९/२०२५ अन्वये आर्म्स अॅक्ट कलम ३/२५, ४/२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, ३ दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
या कारवाईत पो.उ.नि. राहुल तायडे हे प्रमुख तपास अधिकारी असून, पो.कॉ. चेतन पाटील सहाय्यक तपास करत आहेत. सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे, तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

