गावठी कट्टे, तलवारी, गाडी, मोबाईल, रोकड असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
चोपडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरात मध्यरात्री शस्त्रसज्ज अवस्थेत रस्तालुटीसाठी थांबलेल्या सात सराईत गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी चोख बंदोबस्तात जेरबंद केले आहे. शिरपूर बायपास रोडवर संशयास्पदरित्या उभी असलेल्या चारचाकी गाडीवर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. यामध्ये दोन आरोपींच्या कंबरेत लोड केलेले गावठी कट्टे, तसेच गाडीत दोन तलवारी व रिकामे मॅगझिन मिळून आले आहे.
ही कारवाई दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री साडेदोन वाजता चोपडा शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनंतर करण्यात आली. तात्काळ पोलिस पथक तयार करून संशयित वाहनाचा शोध घेतला असता रणगाडा चौकाजवळील शिरपूर बायपास रोडच्या बाजूला स्विफ्ट डिझायर (क्र. MH-26-CH-1733) ही गाडी उभी आढळली. पोलिस पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच घेराव घालून सर्वांना पकडले.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे…
१. दिलीपसिंग हरिसिंग पवार (३२, नांदेड)
२. विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, वैजापूर, संभाजीनगर)
३. अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२५, नांदेड)
४. अमनदीपसिंग अवतारसिंग राठोड (२५, नांदेड)
५. सद्दामहुसेन मोहम्मद अमीन (३३, नांदेड)
६. अक्षय रविंद्र महाले (३०, चोपडा)
७. जयेश राजेंद्र महाजन (३०, चोपडा)
सर्व आरोपी सराईत गुन्हेगार; अनेक ठिकाणी गुन्हे दाखल…
चौकशीतून उघड झाले की, आरोपी हे नांदेड आणि संभाजीनगर येथील कुख्यात गुन्हेगार असून, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, अग्निशस्त्र बाळगणे, दहशत माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे त्यांच्या विरुद्ध नोंद आहेत. काही आरोपी अलीकडेच एमपीडीए (M.P.D.A.) कायद्यान्वये स्थानबद्धतेनंतर सुटलेले आहेत, तर एक आरोपी वैजापूरमधील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम, चारचाकी वाहन अशा एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नवीन गुन्हा नोंदविला :
सदर आरोपींविरुद्ध गु.र.नं. ५८१/२०२५ अंतर्गत,भा.न्या.सं. कलम ३१०(४), ३१०(५), शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
दहशतीचा तपास सुरु...
तपासात आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नांदेड परिसरात हे आरोपी शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणे, लोकांचे अपहरण करणे, त्यांना विवस्त्र करून छळ करणे आणि त्याचे व्हिडिओ तयार करून धमकावणे असे कृत्ये करत असल्याचे उघड झाले आहे. त्याबाबतचा तपास सुरू आहे.
कारवाईतील पोलीस अधिकारी, कर्मचारी..
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे आणि त्यांचे सहकारी पोहेकां हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मेढे, विनोद पाटील, किरण धनगर, योगेश पाटील, प्रकाश ठाकरे यांनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

