Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावराष्ट्रीय एकता परेडसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार सागर सोनार यांची...

राष्ट्रीय एकता परेडसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार सागर सोनार यांची निवड

महाराष्ट्र पोलीस वाद्यवृंद पथकातून मिळणार देशपातळीवरील प्रतिनिधित्व

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी केवडिया, गुजरात येथे “राष्ट्रीय एकता दिवस परेड” चे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील विविध निमलष्करी दलांबरोबरच राज्यातील पोलीस दलांचे निवडक जवान या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या परेडचे प्रमुख अतिथी म्हणून मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत.

या प्रतिष्ठित परेडसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाला अभिमानास्पद यश लाभले असून, जळगाव पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार श्री. सागर अशोक सोनार यांची महाराष्ट्र पोलीस वाद्यवृंद पथकात निवड झाली आहे. श्री. सोनार हे या परेडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. श्री.सागर सोनार हे २०१४ च्या बॅचचे पोलीस कॉन्स्टेबल असून, त्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये त्यांनी जळगाव पोलीस संघाला अनेक पदके मिळवून दिली आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यशैली, संगीत व क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्यामुळेच त्यांची राष्ट्रीय परेडसाठी निवड झाली आहे.

या निवडीसाठी श्री. सागर सोनार यांना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नकाते, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. आव्हाड, राखीव पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत सुगरवार, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन चिवंडे तसेच जळगाव जिल्हा वाद्यवृंद पथक प्रमुख श्री. सलीम खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.राष्ट्रीय एकता दिवस परेडमध्ये श्री. सोनार यांच्या सहभागामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलासोबतच संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या