Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळ तालुक्यातील २५.४२ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा..! भुसावळ पोलिसांची उल्लेखनीय...

भुसावळ तालुक्यातील २५.४२ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा..! भुसावळ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..

ड्रायव्हरच निघाला मुख्य सूत्रधार ; सहा आरोपी अटकेत ; २३.४२ लाख रुपये रोख व तीन मोबाईल जप्त

भुसावळ | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा (गु.र.नं. २०७/२०२५) अवघ्या ४८ तासांत भेद उघड करताना पोलिसांनी सहा आरोपींना जेरबंद केले आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली असून, फिर्यादीच्याच कंपनीत कार्यरत असलेला ड्रायव्हर शाहीद बेग हाच या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी शाहीद बेगसह सहा आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

घटनेचा तपशील :
दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.२० वाजता, फिर्यादी मोहम्मद यासीन इस्माईल हे आपल्या कार्यालयातील २५.४२ लाख रुपये एका बॅगेत घेऊन मोटारसायकल (एमएच १९-बीसी-५५८६) वरून घरी जात होते. दरम्यान, खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटारसायकलला धक्का दिला. तोल गेल्याने फिर्यादी जमिनीवर पडले आणि आरोपींनी पेट्रोल टाकीवर ठेवलेली रकमेची बॅग बळजबरीनं हिसकावून घेत मोटारसायकलवरून पसार झाले.या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची चक्रे आणि गुन्ह्याचा छडा :
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. चौकशीत त्यानेच गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली.

‘टिप’ देणारा फिर्यादीचाच ड्रायव्हर :
शाहीद बेग हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर असल्याने, त्याला पैशांच्या ने-आण वेळांची माहिती होती. त्यानेच ही माहिती आपल्या साथीदारांना पुरविली.

कट रचणारे प्रमुख आरोपी :
शाहीद बेगने मुजाहीद आसीफ मलिक व मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम या दोघांसोबत योजना आखली.

प्रत्यक्ष लुटी करणारे :
मुजाहीदने ही योजना रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलिक, अमीर खान युनुस खान आणि इजहार बेग इरफान बेग या तिघांना सांगितली. या तिघांनीच घटनेच्या रात्री प्रत्यक्ष स्थळी जाऊन लुटीची घटना घडवून आणली. तपासादरम्यान सर्व आरोपींनी संगनमत करून दरोड्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाल्याने, गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम ३१०(२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी :
१) शाहीद बेग इब्राहिम बेग (२५, रा. भुसावळ) — मुख्य सूत्रधार / ड्रायव्हर.
२) मुजाहीद आसीफ मलिक (२०, रा. भुसावळ) — कट रचणारा.
३) मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम (१९, रा. भुसावळ) — कट रचणारा.
४) अजहर फरीद मलिक (२४, रा. रसलपूर, ता. रावेर) — प्रत्यक्ष लुटीतील आरोपी.
५) अमीर खान युनुस खान (२४, रा. रसलपूर, ता. रावेर) — प्रत्यक्ष लुटीतील आरोपी.
६) इजहार बेग इरफान बेग (२३, रा. रसलपूर, ता. रावेर) — प्रत्यक्ष लुटीतील आरोपी.या सर्व आरोपींना दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी :
आरोपींपैकी काहीजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे तपासात समोर आले आहे.यापैकी शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.तर अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविला गेला आहे.

जप्ती व पुढील तपास :
पोलिसांनी आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपये रोख व तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. उर्वरित २ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्याचे काम सुरू आहे. सर्व आरोपींना मा. न्यायालयाने दि. ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड (भुसावळ तालुका पो.स्टे.) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तपास पथकाचे कौतुकास्पद यश :
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्था. गु.शा. जळगाव), पोलीस निरीक्षक राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.), आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका पो.स्टे.) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तपास पथकात पो.उपनिरीक्षक रवी नरवडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, पूजा अंधारे, संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, जितू ठाकरे, योगेश माळी, भुषण चौधरी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, प्रमोद पाटील आदींचा समावेश असून, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मोठी लूट प्रकरण अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आली.

भुसावळ पोलिसांचे वेगवान व अचूक तपास कौतुकास्पद ठरले असून, अवघ्या ४८ तासांत लुटीचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्यात पोलीस दलाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या