Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमखूनप्रयत्नातील २०२१ पासून फरार असलेला आरोपी अखेर गजाआड : आरोपी ‘राजू धनगर’...

खूनप्रयत्नातील २०२१ पासून फरार असलेला आरोपी अखेर गजाआड : आरोपी ‘राजू धनगर’ याला नशिराबाद पोलिसांनी घेतले ताब्यात

नशिराबाद | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत २०२१ साली झालेल्या खूनप्रयत्न प्रकरणातील फरारी आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा हा आरोपी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून शिताफीने ताब्यात घेतला असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावत सबजेल जळगाव येथे रवाना केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील गारवा हॉटेलजवळ सन २०२१ मध्ये राजू मनोहर राठोड उर्फ राजू धनगर (वय ४१, रा. महादेव मंदिराजवळ, हर्सूल, छत्रपती संभाजीनगर) या इसमाने एका व्यक्तीवर हातोड्याने हल्ला करून गंभीर दुखापती केल्या होत्या. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेतला असता तो सापडत नव्हता. त्यामुळे न्यायालयाकडून त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट काढण्यात आले. मात्र आरोपी मिळून न आल्याने न्यायालयाने पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ८२ व ८३ अंतर्गत जाहीर अधिसूचना व जप्ती आदेश जारी केला होता. तरीदेखील आरोपी लपून बसला होता.

दरम्यान, मा.पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक ए.सी.मनोरे यांनी विशेष पथक गठित केले. या पथकात पो.हे.कॉ.शरद वसंतराव भालेराव आणि पो.कॉ.सागर श्रावण भिडे नशिराबाद पोलीस स्टेशन) यांचा समावेश होता.सदर पथकाने गुप्त बातमीदारामार्फत आरोपीचा मागोवा घेत छत्रपती संभाजीनगर परिसरातून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळविले. त्यानंतर आरोपीस नशिराबाद येथे आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला M.C.R. मंजूर करून सबजेल जळगाव येथे पाठविले आहे.

या धाडसी आणि संयोजित कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी साहेब यांनी पथकातील पोलीस अंमलदारांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या