जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील मेहरुण शिवारात अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना महसूल विभागाच्या पथकावर वाहनचालकाने सरकारी कामात अडथळा निर्माण करून वाहन घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी रुपेश अनिल ठाकूर यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्त ; संशयास्पद डंपर ताब्यात घेण्याचा प्रयत्न…
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी रुपेश ठाकूर (रा. योगेश्वर नगर, जळगाव, वय ३५) हे तरसोद (ता. जळगाव) येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग तसेच तहसिलदार जळगाव यांच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी शनिवार, दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री महसूल पथक गस्तीस होते. या पथकात अजिंक्य आंधळे (मंडळ अधिकारी, आसोदा), अभिजीत येवले (मंडळ अधिकारी, म्हसावद), मिलींद देवरे (मंडळ अधिकारी, नशिराबाद), हेमंत जोशी (ग्राम महसूल अधिकारी, जळगाव खुर्द) आणि आकाश काळे (ग्राम महसूल अधिकारी, बेळी) यांचा समावेश होता.
‘जय बजरंग’ लिहिलेल्या डंपरमधून वाहत असलेले पाणी पाहून संशय..
रात्री सुमारास ९.१० वाजता मेहरुण शिवारातील गोल्डन नेस्ट हॉटेलसमोरून पाचोरा-जळगाव रोडवर एक भरधाव डंपर येताना दिसले. त्या वाहनाच्या ट्रॉलीतून पाणी गळत असल्याने त्यामध्ये वाळू असल्याचा संशय आला. महसूल पथकाने वाहन थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याने वाहनात वाळू असल्याचे कबूल केले, मात्र वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
वाहनावर नंबर नसलेले, ‘जय बजरंग’ व ‘नंदी’ लिहिलेले चिन्ह
पथकातील अधिकारी आकाश काळे आणि रुपेश ठाकूर यांनी वाहनाची पाहणी केली असता त्यात अंदाजे चार ब्रास वाळू असल्याचे निदर्शनास आले. वाहनावर पुढील व मागील नंबर नव्हता. टाटा कंपनीचे हे डंपर पांढऱ्या रंगाची केबिन आणि निळ्या रंगाची ट्रॉली असलेले होते. पुढील काचांवर ‘जय बजरंग’ आणि ट्रॉलीखालील भागावर ‘नंदी’ असे ठळक अक्षरात लिहिलेले होते.
वाहनचालकाने सांगितले ; वाहन माझेच आहे! आणि नंतर पळवून नेले…
चालकाने आपले नाव अर्जुन राठोड, रा. पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, आंबेडकर मार्केट परिसर, जळगाव असे सांगितले. त्याच्या शेजारील साथीदाराचे नाव शेखर वासुदेव सोनवणे, रा. कानसवाडे, ता. जळगाव असे सांगण्यात आले. चालकास वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील प्रशासकीय इमारतीच्या आवारात नेण्यास सांगितले असता, त्याने साथीदारास खाली उतरवले आणि शासकीय पथकाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने पळवून नेले.
शासकीय कामात अडथळा.. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
सरकारी कामात अडथळा निर्माण करून अवैध वाळू वाहतूक प्रकरणात सहभागी झाल्याबद्दल अर्जुन राठोड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 132, 303(2), 221 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 48(7), 48(8) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद..
पुढील तपास सुरू
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीच्या या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीस तातडीने अटक करण्याची मागणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

