Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावप्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह उसळला!

प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह उसळला!

सात हजार विद्यार्थ्यांनी घेतली केंद्र-राज्य योजनांची माहिती ; बुधवारी पारितोषिक वितरणाने होणार समारोप

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ या भव्य प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी नागरिक आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगळवारी तब्बल सात हजारांहून अधिक विद्यार्थी तसेच विविध मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती घेतली.

या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी मा. श्री. रोहन घुगे, भाजपा जळगाव महानगर अध्यक्ष श्री. दीपक सूर्यवंशी, ग. स. चे माजी चेअरमन श्री. मनोज पाटील, एल.डी.एम. श्री. सुनील डोहरे, दूध उत्पादक संघाचे संचालक श्री. रोहित निकम, मा. जि.प. सदस्य श्री. आर.जी. नाना पाटील, श्री. अनिल देशमुख, उद्योजक श्री. कंवरलालजी संघवी, श्री. अरुण बोरोले, श्री. भास्कर बोरोले, श्री. चंद्रकांत बेंडाळे, कृषी संचालक (आत्मा) श्री. अनिल भोकरे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. गोपाळ भंगाळे, कृषी विज्ञान केंद्र ममुराबादचे प्रमुख श्री. हेमंत बाहेती, तसेच नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. जयदीप पाटील यांची उपस्थिती लाभली.

दिल्लीस्थित फ्रेंड्‌झ एक्झिबिशन अँड प्रमोशनच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे माहितीपर स्टॉल्स पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दोन दिवसांतच प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने हे आयोजन जळगावमध्ये अत्यंत यशस्वी ठरले आहे.या प्रदर्शनाचा समारोप बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार असून यावेळी आकर्षक आणि माहितीपूर्ण स्टॉल्स उभारणाऱ्या विभागांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कोंबड्यांचा मेळा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू!

साडेतीन किलोचा कावेरी आणि अडीच किलोचा कडकनाथ पाहून युवक झाले थक्क!

प्रदर्शनातील सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या स्टॉलवर युवकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली. येथे साडेतीन किलो वजनाचा कावेरी आणि अडीच किलो वजनाचा कडकनाथ कोंबडा पाहून उपस्थित युवक भारावून गेले.युवकांनी कुक्कुटपालन व्यवसाय, प्रशिक्षण, शासकीय योजना आणि सबसिडीबाबत सविस्तर माहिती घेतली. या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील तरुणांमध्ये कुक्कुटपालनाबद्दल उत्सुकता वाढेल, असे आयुक्त श्री. पोपटराव पवार आणि श्री. किशोर कदम यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञान प्रकल्प ठरले आकर्षणाचा विषय!

केसीईची सोलरबेस सायकल, गोदावरीची चार्जिंग बाईक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ड्रोन ठरले हिट

प्रदर्शनात स्थानिक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नवोन्मेषी प्रकल्प प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले.
केसीई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली सोलरबेस सायकल चर्चेचा विषय ठरली. अडीच किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीवर चालणारी ही सायकल सोलर पॅनेलवर चार्ज होऊन ताशी 15 किमी वेगाने धावते, अशी माहिती यश पाटील व दर्शन रहाडे यांनी दिली.गोदावरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वयोवृद्धांसाठी बनविलेली चार्जिंग बाईक सादर केली. 250 वॅट बॅटरीवर चालणारी ही बाईक तब्बल 120 किमी रेंज देते, अशी माहिती मयूर कोळी व राहुल कुमावत यांनी दिली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ड्रोन प्रकल्प सर्वाधिक लोकप्रिय ठरला. “आमच्या कॉलेजकडे जळगावमधील सर्वात मोठा थ्री-डी प्रिंटर असून आम्ही आर्मी, शेती फवारणी, फोटो-व्हिडिओ आणि सुरक्षेसाठी विविध प्रकारचे मायक्रो व मोठे ड्रोन विकसित केले आहेत,” असे सुमित भड आणि अर्णव पूरी यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या