पाच महिलांची सुटका; चार जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल.
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मन्यारखेडा शिवारातील दूरदर्शन टॉवरसमोर असलेल्या घरामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नशिराबाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर सर्च ऑपरेशन राबवून धाड टाकली. या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून चार जणांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राफड घरामध्ये काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली होत असल्याची गुप्त माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे यांनी AHTU (Anti Human Trafficking Unit) पथकाच्या सहाय्याने सापळा रचला. पथकाने वेधक पद्धतीने छापा टाकत सुरू असलेली वेश्या व्यवसायाची गैरकायदेशीर क्रिया उघडकीस आणली. कारवाईदरम्यान कुंटणखाना चालवणारा चेतन माळी (रा. कुसुंबा), त्याचे साथीदार राम विश्वास बोरसे व श्याम विश्वास बोरसे (रा. जळगाव) तसेच एका पुरुष ग्राहकास ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडे समुपदेशन करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
ही धाड सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रवींद्र तायडे, संजय महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गायकवाड, सागर बिडे, भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार, युगंधरा नारखेडे, मोनाली दहिभाते यांच्या सहभागाने झाली. या धाडीनंतर परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी आता कडक अंकुश ठेवला असून मानव तस्करीसारख्या गुन्ह्यांबाबत पोलिसांची गंभीर व ठोस भूमिका असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

