मधापुरी, लालगोटा, हलखेडा गावात स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई
मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-
जळगाव जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या मालमत्ता विरुद्ध गुन्ह्यांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आणि मुक्ताईनगर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली. गुरुवारी (दि. ८ नोव्हेंबर २०२५) मध्यरात्री मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मधापुरी, लालगोटा आणि हलखेडा या गावांमध्ये अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. जिल्ह्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने संशयित व फरार आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) व पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ (मुक्ताईनगर पो. स्टे.) यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने कोंबिंग ऑपरेशन केले. या दरम्यान विविध गावांतून एकूण १५ संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या तपासणीत कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील (४५), दीपमाला कमलेश पाटील (३८) (रा. मधापुरी) यांच्या विरोधात गुन्हा क्र. ३६/२०२५, भा.दं.वि. कलम ३१० (२) अन्वये गुन्हा नोंद असल्याचे आढळले. सदर दोन्ही आरोपी गुन्हा नोंदीनंतर फरार होते. त्यांना तातडीने अटक करण्यात आली.तसेच ताब्यात घेतलेल्या ईतर १३ जणांवर यापूर्वी चोरी, दरोडा इ. स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या विरोधात भादंवि कलम १२८ व १२९ नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.या कारवाईमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा सहभागी होता.
या ऑपरेशनमध्ये
०१ पोलीस निरीक्षक
०४ सहायता पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक
१३० पोलीस अंमलदार
०४ आरसीपी पथके
यांनी सहभाग घेतला.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

