राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सदस्यपदासह थेट अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठीची सुविधा https://mahasecelec.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे सुरू आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नामनिर्देशनपत्र दाखल करताना कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची ऑनलाइन अपलोड करण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांनी संकेतस्थळावर सर्व माहिती परिपूर्ण स्वरूपात भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून स्वतःची तसेच सूचकांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवश्यक आहे. ही स्वाक्षरी केलेली प्रिंट प्रत विहित मुदतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक आहे.
१७ नोव्हेंबरपर्यंत २४ तास संकेतस्थळ उपलब्ध…
इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणीची सुविधा १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अखंड सुरू राहणार आहे. या कालावधीत उमेदवार कोणत्याही वेळी नोंदणी करू शकतात. नोंदणी करताना तयार केलेला लॉगिन आयडी व पासवर्ड सुरक्षित ठेवणे आवश्यक असून, नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी त्याच लॉगिनची आवश्यकता असते. स्वाक्षरी केलेले नामनिर्देशनपत्र तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांचा संच १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपूर्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास सादर करणे आवश्यक आहे.
शनिवारीदेखील अर्ज स्वीकारणार; रविवारी सुट्टी..!
राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, १५ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) हा अधिकृत सुट्टीचा दिवस असूनही त्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहे. मात्र, १६ नोव्हेंबर रविवार या दिवशी कोणत्याही अर्जांची नोंद होणार नाही.
सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची यादी…
नामनिर्देशनपत्रासोबत खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती सादर करणे आवश्यक आहे.
१) नगर परिषद / नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र.
शौचालय वापराचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र.
२) निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बँक खात्याचा तपशील.
३) राखीव जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जातप्रमाणपत्र.
४) पक्षीय उमेदवारांसाठी जोडपत्र-१० किंवा जोडपत्र-२.
सर्व कागदपत्रांचा संपूर्ण संच निर्धारित वेळेत सादर न झाल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

