धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- धरणगाव-जळगाव रोडवरील मुसळी फाट्यानजिक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या जबरी लुटीचा गुन्हा धरणगाव पोलिसांनी केवळ चार तासांत उघडकीस आणत चार आरोपींना अटक केली. फिर्यादी धनंजय शंकर पाटील (रा. खोडांमळी, ता. नंदुरबार) यांच्याकडून ३० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली होती.
फिर्यादी हे पद्मावती कन्स्ट्रक्शन, खामगाव येथे सुपरवायझर म्हणून कार्यरत असून, ते आपल्या कामगार व ठेकेदारासह एमपी-१३-झेडयू-९४४० या वाहनाने निघाले होते. रात्री ११.१५ च्या सुमारास मुसळी गावाजवळील बोर्डाजवळ पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कारमधून आलेल्या चार इसमांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना व कामगारांना गाडीतून बाहेर खेचले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या खिशातील ३०,००० रुपये जबरीने काढून आरोपी पळून गेले. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम ३०९(४), १२६, ११५(२), ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर तात्काळ सुरु झालेल्या रात्र गस्तीदरम्यान पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या पथकाने स.पो.नि. प्रशांत कंडारे, पो.उप.नि संतोष पवार, पो.हे.का. महेंद्र बागुल, समाधान भागवत, सुधीर चौधरी, पो.का. संदीप पाटील, पो.कों. किशोर भोई यांनी तक्रारदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित (१) सुनिल अशोक कुहाडे व (२) विजय मेवालाल मोहीते यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत आणखी दोन साथीदारांची माहिती दिली.
पुढील तपासातून (३) गणेश लक्ष्मण अहीरे आणि (४) कृष्णा अशोक राठोड हे देखील गुन्ह्यात सामील असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पांढरे वाहन क्र. MH14 LX 8515 जप्त करण्यात आले, तर लुटलेली २९,७०० रुपयांची रोकडही पोलिसांना मिळून आली.धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील सर्व चार आरोपींना १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास पाळधी दुय्यम स्थानकाचे सपोनि प्रशांत कंडारे करीत आहेत.

