Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभडगाव परिसरातून ३ अल्पवयीन मुली बेपत्ता ; राजस्थानमधून मुलींची सुखरूप सुटका पोलिसांची...

भडगाव परिसरातून ३ अल्पवयीन मुली बेपत्ता ; राजस्थानमधून मुलींची सुखरूप सुटका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..!

भडगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले. मुलींचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र कोणताही ठोस सुगावा न लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, फिर्यादीची पुतणीदेखील बेपत्ता झाल्याचे उघड झाल्यानंतर तात्काळ भडगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार गुरन-३८०/२०२५ व गुरन-३८१/२०२५ असे दोन स्वतंत्र गुन्हे भा.दं.वि. कलम १३७(२) अन्वये नोंदविण्यात आले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक जळगाव मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या. चौकशीदरम्यान मुलींच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आदींकडून माहिती घेतली असता जवळच्या परिसरातील तीन तरुण मुलेदेखील बेपत्ता असल्याचे उघड झाले. सर्वांच्या मोबाईल फोन बंद असल्याने तांत्रिक मदतीचा आधार घेत २ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. त्यापैकी एक पथक जळगाव व दुसरे चाळीसगावकडे रवाना करण्यात आले.जळगाव रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित मुलगे व मुली दिनांक २० ऑक्टोबरच्या रात्री १.२२ वाजताच्या सुमारास स्टेशनवरील तिकीट घराजवळ दिसून आले. सदर वेळेत कोणत्या गाड्या ये-जा करतात याची चौकशी केली असता, त्या वेळेत झेलम एक्सप्रेसद्वारे ते पुढे गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित मुलामुलींच्या नातेवाईकांकडून विविध ठिकाणांची माहिती, संपर्क क्रमांक संकलित करून पुढील तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि नातेवाईकांकडून घेतलेल्या सखोल चौकशीच्या आधारे आरोपी क्रमांक १) रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे, २) अजय सुकलाल देवडे व ३) अमोल ईश्वर सोनवणे यांचा माग काढण्यात आला. अखेर पोलिस पथकाने राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातून त्यांना ताब्यात घेत तीनही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका केली.सदर तपास मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम (चाळीसगाव विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोउनि. सुशिल सोनवणे, पोहेका पांडुरंग पाटील, पोना मनोहर पाटील, पोका महेंद्र चव्हाण, पोकौ प्रविण परदेशी, पोको मिलिंद जाधव, मपोका सोनी सपकाळे आदींनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत उकल घडवून आणली.

जळगाव पोलिसांनी पालकांना आवाहन केले आहे की, मुला-मुलींवर योग्य लक्ष ठेवून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवावी, तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या