जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज (दौड, पुणे) येथे घेतलेल्या ब्रास बँड मेजर कोर्स सत्र क्र. 80 मध्ये जळगाव पोलीस दलातील पोलीस हवालदार क्र. 3133 नाईम शाह सलीम शाह यांनी उल्लेखनीय प्राविण्य मिळवत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दिनांक 22 एप्रिल 2025 ते 22 जुलै 2025 या कालावधीत अत्यंत कठोर व शिस्तबद्ध प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी अंतिम परीक्षेत A+ श्रेणी संपादन केली.
या यशाने जळगाव पोलीस दलाचे मान उंचावल्याने मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले असून, प्रोत्साहनपर दोन हजार रुपये पारितोषिक जाहीर केले आहे. या यशामागे मा. पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. उपअधीक्षक (गृह), राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव श्री. प्रशांत सुगरवार तसेच पोलीस बँड मेजर जळगाव श्री. खान सर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे शाह यांनी सांगितले.
नाईम शाह यांच्या कामगिरीमुळे पोलीस मुख्यालय बँड पथकासह संपूर्ण जळगाव पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

