१६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नगरसेवक पदासाठी ७१ अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी केवळ एक अर्ज दाखल.
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर नशिराबादमधील राजकीय वातावरणात अचानक मोठी उलथापालथ झाली आहे. अनेक दिवसांपासून महायुतीत उफाळत असलेला अंतर्गत तणाव अखेर परमोच्च बिंदूवर पोहोचला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीने निर्णायक वळण घेतले आहे. त्यांनी महायुतीतून काढता पाय घेत निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधला असता आमच्यापर्यंत अजून कोणतीही अधिकृत माहिती न आल्याचे त्यांनी सांगितले.
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकिचा बिगुल वाजला तेव्हा सुरुवातीला महायुती तर्फे नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार जाहीर करण्यात आला होता. निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलले जात असल्याच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते संतप्त झाले होते. पक्षाकडून उमेदवार देऊनही युतीच्या दबावाखाली मागे हटावे लागले, मात्र “कार्यक्षेत्रातील दुर्लक्ष, सततची उपेक्षा आणि कार्यकर्त्यांचा अपमान” या कारणांनी नाराजी शिगेला पोहोचल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.या परिस्थितीची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावरून मोठा निर्णय घोषित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आता नशिराबाद नगरपरिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे.यामुळे महायुतीसमोर कठीण आव्हान उभे राहिले असून नगराध्यक्ष पदासाठीची लढत आता थेट महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी रंगणार आहे. पक्षाकडून नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक जागांवर उमेदवार उभे करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सेना भी तैयार सेनापती भी तैयार ! प्रमाणे भावी नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे पोस्टर झळकू लागल्याने कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील काही दिवसांत समीकरणांमध्ये आणखी नाट्यमय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नगरसेवक पदासाठी ७१ अर्ज दाखल झाले आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी केवळ एका उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला आहे.
१४ नोव्हेंबर ०६ – नगराध्यक्ष ००
१५ नोव्हेंबर ४० – नगराध्यक्ष ००
१६ नोव्हेंबर २५ – आणि नगराध्यक्ष ०१


