नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेल्या गणेश चव्हाण यांनी आज मोठ्या उत्साहात नामांकन अर्ज दाखल केला. शहरात सातत्यपूर्ण काम, सर्वसामान्यांमध्ये साधेपणाची वर्तणूक आणि जनसंपर्काची भक्कम पायाभरणी यामुळे चव्हाण यांच्या पाठराख्यात वाढ होत असल्याचे उपस्थित नागरिकांच्या गर्दीतून स्पष्टपणे जाणवत होते.नामांकनावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, सय्यद बरकत अली यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची मोठी उपस्थिती व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा या कार्यक्रमाचा विशेष ठसा ठरला.
गणेश चव्हाण हे गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नशिराबाद शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असून, या काळात पक्षवाढीसाठी आरोग्य शिबीरासह अनेक उपक्रमांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, सातत्य आणि जिद्द यामुळे स्थानिक स्तरावर त्यांच्याबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.चव्हाण हे दीर्घकाळापासून ‘शिव सह्याद्री प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत नशिराबाद परिसरात विविध जनसेवा उपक्रम राबवत आहेत. गरजूंसाठी वैद्यकीय मदत, स्वच्छता मोहिमा व आरोग्यविषयक कार्यक्रम या कार्यातून त्यांचे सामाजिक भान सतत प्रकट झाले आहे. या उपक्रमांमुळे ते नशिराबादमध्ये आदर्श कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात.
गणेश चव्हाण यांच्या नामांकनावेळी दिसलेला उत्साह आणि नागरिकांची उपस्थिती आगामी निवडणूक वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेससाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

