Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्ह्यात नशिराबाद सह मुक्ताईनगर, शेंदुर्णी मतमोजणी केंद्रात बदल : केंद्र बदलासाठी...

जळगाव जिल्ह्यात नशिराबाद सह मुक्ताईनगर, शेंदुर्णी मतमोजणी केंद्रात बदल : केंद्र बदलासाठी आयोगाची मान्यता ; मतदान यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात.

मतदान यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात ; दोन टप्प्यांत २२५ कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर, शेंदुर्णी आणि नशिराबाद या तीन पालिकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रांमध्ये बदल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. दि.२ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर तत्परतेने दि.३ डिसेंबरला घेतली जाणारी मतमोजणी सुकर व्हावी, यासाठी प्रशासनाने नव्या केंद्रांची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रियेनंतरची सर्व घडामोडी सुरळीत राहाव्यात, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यकांच्या नियुक्तीनंतर केंद्रांची निवड अचूक व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. मात्र पूर्वनियोजित ठिकाणी तांत्रिक अडचणींबाबत स्थानिक प्रशासनाकडून अहवाल मिळाल्यानंतर मतमोजणी केंद्र बदलण्याचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे.

नवीन केंद्रांची यादी:-
मुक्ताईनगर : तहसीलदार कार्यालयाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह.

शेंदुर्णी : माहेश्वरी मंगल कार्यालयाऐवजी गरुड महाविद्यालय इनडोअर स्टेडियम.

नशिराबाद : लेवा संस्था हॉलऐवजी जिल्हा समादेशक होमगार्ड व नागरी संस्था प्रशिक्षण केंद्र.

दिनांक २ ते ३ डिसेंबरदरम्यान निश्चित केंद्रे इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने देऊ नयेत, असा पूर्वीच आदेश देण्यात आला होता. तथापि तीनही ठिकाणी तांत्रिक अडथळ्यांची शक्यता लक्षात येताच पर्यायी स्थळांची निवड करण्यात आली आहे.

नशिराबाद मतमोजणी केंद्राचा बदल.
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीला यंदा विशेष महत्त्व लाभले आहे. वाढलेली उमेदवारी, १६२ उमेदवारांची झालेली वेगवान चारित्र्य पडताळणी त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी एकूण १५ अर्ज तसेच नगरसेवक पदासाठी १४४ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अर्ज छाननी नंतर नगराध्यक्ष पदाचे १० अर्ज वैध तसेच नगरसेवक पदाचे ११४ अर्ज वैध आल्याने आणि राजकीय समीकरणांतील नाट्यमय उलथापालथ यामुळे शहरात मतदारांमध्ये मतमोजणी प्रक्रियेबाबत उत्सुकता अधिक आहे. पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या लेवा संस्था हॉलमध्ये जागा व मनुष्यबळ व्यवस्थापनासंबंधी अडचणी निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे अधिक सुरक्षित, प्रशस्त आणि तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असे ठिकाण म्हणून जिल्हा समादेशक होमगार्ड व नागरी संस्था प्रशिक्षण केंद्र अंतिमतः निवडले गेले. नवीन ठिकाणी सुरक्षेसह मतमोजणी टेबलांचे नियोजन, पार्किंग, कर्मचारी तैनाती आणि निकाल जाहीर करण्याची व्यवस्था अधिक काटेकोरपणे करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

मतदान यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात ; दोन टप्प्यांत २२५ कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण.
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३२ मतदान केंद्रांसाठी नियुक्त २२५ कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे. मतदानाच्या दिवशी कोणतीही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशिक्षण सत्रे काळजीपूर्वक नियोजित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली. प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण २० नोव्हेंबर रोजी होणार असून, यात मतदान केंद्रावरील मूलभूत कामकाज, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे संचालन, मतदार ओळख पडताळणी, केंद्रावरील शिस्तपालन तसेच आचारसंहितेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष तयारी अधिक मजबूत करण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या व अंतिम टप्प्याचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या सत्रात प्रत्यक्ष सराव, तांत्रिक त्रुटींचे त्वरित निराकरण, अनपेक्षित परिस्थिती हाताळण्याची कौशल्य आणि समन्वय प्रणालीवर विशेष भर दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या