जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख दीपक रंजन बिंदेश्वरसिंग (वय २५, मुळगाव – आधारपूर, बिहार; ह.मु. – नशिराबाद) अशी आहे. दीपक हा भादली रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर चालू असलेल्या कामावर कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता.बुधवारी सकाळी कामावर जाण्यासाठी त्याचे सहकारी रूमवर गेले असता, दरवाजा आतून बंद आढळला. शंका आल्याने नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. त्या वेळी दीपकने गळफास घेतल्याचे दिसून आले.घटनेची माहिती तत्काळ नशिराबाद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला आणि पुढील तपासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी केल्यानंतर दीपकला मृत घोषित केले.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नशिराबाद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, प्राथमिक तपास पोलीस कॉन्स्टेबल सागर बिडे हे करीत आहेत.

