नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– नशिराबाद येथे स्थानिक पत्रकारांनी एकत्र येत ‘पत्रकारांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संघटनाची गरज भासते, म्हणून पत्रकार मंच आवश्यक आहे’ या भूमिकेतून नशिराबाद पत्रकार मंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक 23 रोजी झालेल्या बैठकीत न्यूज18 लोकमतचे पत्रकार, दिव्य मराठीचे पत्रकार नितीन नांदुरकर, देशदूतचे उपसंपादक राजेंद्र पाटील, पोलीस दक्षताचे संपादक चंदन पाटील, दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी हरीश पाटील, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी सुनील माळी, दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी सुनील भावसार, तसेच दैनिक सकाळचे प्रतिनिधी विश्वनाथ महाजन, खानदेश टुडे न्यूजचे संपादक मोहम्मद युनूस शेख व न्यूज प्रतिनिधी शेख इम्रान उपस्थित होते.पत्रकारांच्या व्यावसायिक समस्यांवर एकत्रितपणे उपाययोजना करण्यासाठी, तसेच समाजातील प्रश्नांवर अधिक जबाबदारीने भूमिका बजावण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल, असे सर्व पत्रकारांनी सांगितले.
यावेळी नशिराबाद पत्रकार मंचतर्फे दर महिन्याला एक समाजोपयोगी कॅम्प आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पत्रकारांचे सामाजिक भान वाढविणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवण्याचा यामागील हेतू असल्याचे बैठकीत ठळकपणे नमूद करण्यात आले.

