Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद निवडणूक ; प्रभाग ६(ब) मधील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद...

नशिराबाद नगरपरिषद निवडणूक ; प्रभाग ६(ब) मधील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे अपक्ष उमेदवार उल्हास चौधरी यांची जाहीर माघार.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ६(ब) मध्ये उमेदवारी दाखल केलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद प्रभाकर पाटील यांना मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. या प्रभागातून शिवसेनेचे अपक्ष उमेदवार उल्हास चौधरी यांनी आज जाहीर सभेत आपल्या उमेदवारीची अधिकृत माघार जाहीर केली.

यापूर्वी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार चौधरी यांनी माघारीच्या अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेण्याचे ठरवले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना नियोजित दिवशी माघार घेणे शक्य झाले नव्हते.मात्र आज नशिराबाद येथे भरलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उल्हास चौधरी यांनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर करत उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

मतदारांना आवाहन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपचे उमेदवार लालचंद प्रभाकर पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा.” असे आवाहन केले. या जाहीर माघारीच्या घोषणेमुळे प्रभाग ६(ब) मधील निवडणुकीत महायुतीकडे एकसंघतेचा संदेश गेला असून, लालचंद पाटील यांच्या विजयाच्या समीकरणांना अधिक बळकटी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या