जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शनिपेठ पोलिसांनी सोन्याच्या अंगठ्या बदलून नकली अंगठ्या ठेवण्याच्या सराईत पद्धतीने गुन्हे करणाऱ्या महिलेला अटक करून 6 लाख 60 हजार रुपये किमतीच्या अंगठ्या जप्त करत मोठे यश मिळवले आहे. जळगाव, संभाजीनगर ते उत्तरप्रदेशपर्यंत फिरत गुन्हे करणारी ही महिला पोलिसांनी बरेली (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतली.दिनांक 04 नोव्हेंबर 2025 रोजी शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात 27 ऑक्टोबर रोजी RC बाफना ज्वेलर्स, सुभाष चौक तसेच ‘भंगाळे गोल्ड’, राजकमल टॉकीज परिसरात हातचलाखीच्या पद्धतीने तीन सोन्याच्या अंगठ्या चोरी झाल्याचे CCTV फुटेजमध्ये समोर आले होते. फिर्यादी गणेश राजाराम काळे (रा. अयोध्या नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता.सदरच अनोळखी महिलेनं जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 नोव्हेंबर रोजी गाळगीळ अँड सन्स ज्वेलर्स येथे याच पद्धतीने सोन्याच्या अंगठ्या बदलून चोरी केली असून त्या संदर्भात गुन्हा दाखल आहे. तसेच संभाजीनगर येथील जिन्सी पोलीस स्टेशन क्षेत्रातील RC बाफना ज्वेलर्स दुकानातसुद्धा तिने तसाच गुन्हा केल्याने 11 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल आहे.

सतत एकाच प्रकारे गुन्हे घडत असल्याने सर्व तिन्ही प्रकरणांमध्ये सदर महिलाच संशयित असल्याचे CCTV तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.तपास अधिकारी पो.हे.का. प्रदीप नन्नवरे, मपो.हे.का. वैषाली पावरा, पो.का. निलेश घुगे यांच्या पथकाला उत्तरप्रदेशातील बरेली येथे पाठवण्यात आले. तेथून संशयित लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून तिन्ही गुन्ह्यातील एकूण 61.67 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या अंगठ्या, किमती 6,60,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात नेत्रम विभागातील पोकों पंकज खडसे, मुबारक तडवी, पोका कुंदसिंग बयस तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी पोका मिलींद जाधव आणि गौरो पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. अटक केलेली महिला सध्या शनिपेठ पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यात दाखल असून प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

