नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल 68.11 टक्के मतदान झाले. एकूण 26,872 मतदारांपैकी 18,303 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 9,589 पुरुष तर 8,714 महिला मतदारांचा समावेश आहे.
नशिराबाद मध्ये सकाळी मतदानाला सुरुवात होताच केंद्रांवर तुलनेने कमी गर्दी होती; मात्र दुपारी १२ नंतर मतदानाचा वेग वाढू लागला. दुपारनंतर तर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची रांग लांबत गेली. संध्याकाळी निर्धारित वेळ संपेपर्यंत अनेक केंद्रांवर शेकडो मतदार रांगेत उभे असल्याचे चित्र दिसले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, वेळेत केंद्रात पोहोचलेल्या मतदारांना वेळेतून बाहेर गेल्यानंतरही मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी किरकोळ गोंधळही निर्माण झाला.प्रशासनाने मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी दिवसभर दक्ष राहून काम पाहत होते.
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीततील केंद्र/बूथ निहाय अंतिम आकडेवारी.

विविध केंद्रांना भेट देऊन पाहणी.
दरम्यान मतदानाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाबराव देवकर, पोलिस उपाधीक्षक अशोक नखाते, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल राजपूत, सहाय्यक निर्णय अधिकारी राहुल वाघ, निरीक्षक धनंजय गोगाटे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी विविध केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
95 वर्षांच्या आजीचा लोकशाहीप्रती उत्साह!
सुनसगाव रस्त्याकडील केंद्रात 95 वर्षीय चंद्रभागा खंडू चौधरी यांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेला सलाम केला. अनेक ज्येष्ठ मतदारांचा सहभागही लक्षणीय होता.
द्वारका नगर केंद्रात काही काळ गोंधळ.
प्रभाग क्रमांक २ व ३ साठी असलेल्या द्वारका नगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील केंद्रात चार बूथ असल्याने दुपारनंतर मोठी गर्दी झाली. नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र यंत्र आणि नगरसेवक पदासाठी एका यंत्रावर दोन पसंती देण्याची प्रक्रिया असल्याने काही मतदारांना मतदान करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे रांगा वाढून नाराजी व्यक्त झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राधिकारी आणि नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक मनोरे यांनी बाहेर येऊन मतदारांना स्पष्ट सूचना केल्यानंतर मतदान सुरळीतपणे सुरू राहिले.
राजकीय पक्षांची गणितं सुरू.
उत्स्फूर्त मतदानामुळे महायुती – म्हणजे भाजप-शिंदे सेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी निकालासाठी आपापल्या पद्धतीने गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयीन आदेशानुसार 2 डिसेंबर रोजी जाहीर होणारा निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, निकाल काय लागतो याकडे मतदारांत आतुरता आहे.

