धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पंचायत समिती धरणगाव येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३२) आणि सागर कोळी (खाजगी इसम) यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर परकुलचा दुसरा हप्ता जमा करून देण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावने गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदारास वर्ष २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत परकुल मंजूर झाला होता. पहिला हप्ता १५ हजार रुपये खात्यात जमा झाल्यानंतर तक्रारदाराने संबंधित बांधकामाचे कामही पूर्ण केले होते. मात्र दुसरा हप्ता न मिळाल्यानंतर त्यांनी पंचायत समितीत चौकशी केली असता अभियंता गणेश पाटील यांनी “निधी उपलब्ध नाही” असे सांगितले.दरम्यान गावातील नागरिकांकडून दुसरा हप्ता मंजूर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार ८ जुलै २०२५ रोजी पुन्हा पंचायत समितीत गेले. तेव्हा अभियंता पाटील यांनी दुसरा हप्ता जमा करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. पंचासमक्ष पडताळणी दरम्यान अभियंता पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तसेच सागर कोळी यांच्यामार्फत रक्कम स्वीकारली जाईल, अशी कबुलीही फोनवर देण्यात आल्याचे निष्पन्न झाले.या आधारे धरणगाव पोलिस स्टेशन येथे गु.नं. ३९१/२०२५, प्रकरण ७ प्रतिबंधक कायदा कलम १२ प्रमाणे ४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईत सहभागी अधिकारी
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक हेमंत नागरे, पो.ना. बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आणि सचिन चाटे यांनी ही कारवाई केली.

