चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून महिलांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील ९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा. सौ. कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग मा. श्री. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील पाहिजे व फरार आरोपींविरोधात विशेष कारवाईचे आदेश देण्यात आले होते. मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०१६ भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये महिलेस विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी युवराज नामदेव पवार (रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) हा गुन्हा केल्यापासून तब्बल ९ वर्षांपासून फरार होता. महिलांबाबतचा हा गंभीर गुन्हा असल्याने आरोपीस अटक करणे अत्यावश्यक होते.
आरोपीचा शोध सुरू असताना तो मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण दातरे यांनी विशेष पथकाची नेमणूक केली. पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अंधेरी, मुंबई येथून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीस मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे आणून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री. प्रविण दातरे (सहायक पोलीस निरीक्षक), पोलीस उपनिरीक्षक श्री. सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. विकास शिरोळे, पोहेका श्री. शांताराम पवार, पोकों श्री. विनोद बेलदार व पोकों श्री. संजय लाटे यांनी पार पाडली.

