चोपडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. निकाल जाहीर होताच चोपड्यातील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, नगरपालिकेची सूत्रे ठामपणे शिंदेगटाच्या हाती गेली आहेत. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात नम्रता सचिन पाटील यांनी स्पष्ट बहुमताच्या जोरावर विजय संपादन केला. निवडणूक प्रचारादरम्यान विकास, शहरातील मूलभूत सुविधा, प्रशासनातील स्थैर्य आणि पारदर्शक कारभार हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. या मुद्द्यांवर मतदारांनी विश्वास व्यक्त केल्याचे निकालातून दिसून आले.
नगरपालिका सदस्य संख्याबळानुसार शिवसेना शिंदेगटाचे एकूण १६ नगरसेवक निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाला ६ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २ जागा मिळाल्या. अपक्ष उमेदवारांनी २ जागांवर विजय मिळवला असून इतर गटांना २ जागा प्राप्त झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना या निवडणुकीत एकही जागा मिळू शकलेली नाही.या निकालांमुळे चोपडा नगरपालिकेत शिवसेना शिंदेगटाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, नगराध्यक्षपदासह नगरसेवक संख्याबळामुळे सत्तेची धुरा त्यांच्या हाती आली आहे.निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. निकाल शांततेत जाहीर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नव्या नेतृत्वाकडून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

