Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावरणगावात राजकीय धक्का : भाजपचे संख्याबळ कायम, मात्र नगराध्यक्षपदी बंडखोर सुनील काळेंचा...

वरणगावात राजकीय धक्का : भाजपचे संख्याबळ कायम, मात्र नगराध्यक्षपदी बंडखोर सुनील काळेंचा विजय

वरणगाव | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- वरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा अनपेक्षित उलटफेर पाहायला मिळाला असून, भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत निवडणूक लढविणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना वरणगावकरांनी नगराध्यक्षपदासाठी स्पष्ट कौल दिला आहे. विशेष म्हणजे, नगरसेवकांच्या संख्याबळात भाजपला स्पष्ट बहुमत मिळूनही पक्षाचा अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार पराभूत झाल्याने ही निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. आरक्षण अनुकूल असल्याने सुनील काळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र भाजपने जिल्हा दूध संघाच्या संचालिका शामलताई अतुल झांबरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने काळे यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेत स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

दरम्यान, स्थानिक राजकारणातील भाजपचे कट्टर विरोधक राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रिंगणात उडी घेतली. तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या पत्नीनेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार बनली.प्रचाराच्या काळात सर्वच उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सुनील काळे यांनी पाणीपुरवठा योजना व शहरातील विकासकामांचे श्रेय स्वतःकडे घेतले, तर भाजपने आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून ही कामे झाल्याचा दावा केला. भाजप उमेदवार शामलताई झांबरे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सभा घेतल्या. कॉर्नर सभा व प्रत्यक्ष संपर्कावर प्रचाराचा भर राहिला. परिणामी शहरातील राजकीय वातावरण तापले होते.रविवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये भाजपच्या शामलताई झांबरे यांना आघाडी मिळाल्याने भाजपच्या गोटात उत्साह निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर सुनील काळे यांनी निर्णायक मुसंडी मारत अखेर विजय संपादन केला.नगरसेवकांच्या निकालाकडे पाहिले असता भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ५, तर राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार गटाचे २ नगरसेवक निवडून आले. संख्याबळाच्या दृष्टीने भाजपची सत्ता स्पष्ट असली, तरी नगराध्यक्षपदी पक्षाचा उमेदवार पराभूत होण्याची दुर्मीळ घटना वरणगावमध्ये घडली असून, या निकालाने स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या