पारोळा | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्याच्या दिशेने पारोळा शहरात आज ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले. लोकदर्पण पत्रकार असोसिएशनच्या बहुप्रतिक्षित पत्रकार सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर प्रत्यक्ष मूर्त स्वरूप मिळाल्याने शहरातील पत्रकार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण होते.लोकदर्पण पत्रकार असोसिएशनसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून सुसज्ज सभागृह उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच नगरसेवकांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, पारोळा पोलीस निरीक्षक अशोक पवार, ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष मनोहर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती विजय सुदाम पाटील, शेतकी संघाचे साहेबराव पाटील, वंजारी गावाचे सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, लोकदर्पण पत्रकार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे व नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात लोकदर्पण पत्रकार असोसिएशनच्या कार्याचे कौतुक करत पत्रकारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रकार सभागृहामुळे शहरातील पत्रकारिता अधिक सक्षम व संघटित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार अमोल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हे सभागृह केवळ एक इमारत नसून पत्रकारांच्या विचारांना, संघर्षाला व स्वाभिमानाला मिळालेली हक्काची ओळख आहे. संविधान, सत्य आणि निर्भीडतेचा आवाज अधिक बुलंद करण्याचे काम येथून होईल. अनेकांनी केवळ आश्वासने दिली, मात्र दिलेला शब्द पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला मनापासून आनंद आहे.”
जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार केल्याबद्दल त्यांनी लोकदर्पण पत्रकार असोसिएशनचे आभार मानले तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकदर्पणचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक भावसार यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष भूपेंद्र मराठे यांनी केले. एकूणच हा सोहळा पत्रकारिता, लोकशाही व विकास यांचा त्रिवेणी संगम ठरला असून नव्या सभागृहाच्या माध्यमातून पारोळ्यातील पत्रकारिता अधिक सक्षम, संघटित व निर्भीड बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

