जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारताचे माननीय उपराष्ट्रपती महोदय यांच्या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या संभाव्य जळगाव जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभाग प्रमुखांची सविस्तर आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत दौऱ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व लॉजिस्टिक्स नियोजन, कार्यक्रमस्थळ व्यवस्थापन, शिष्टाचार पालन, विविध यंत्रणांतील समन्वय तसेच कालबद्ध कार्यवाही या सर्व बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. माननीय उपराष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्यादरम्यान शासन प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यात यावे, तसेच दौरा सुरळीत, सुरक्षित व प्रतिष्ठापूर्ण पार पडावा यासाठी सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करून तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सुरक्षा, वाहतूक व सार्वजनिक व्यवस्थापनाबाबत समन्वयित कृती आराखडा तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला असून, प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर आवश्यक पूर्वतयारी तात्काळ सुरू करण्याचे सूचित करण्यात आले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

