जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नववर्षानिमित्त व आगामी मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर जिल्हा पोलीस दलाने कडक कारवाई सुरू केली आहे. जळगाव शहरासह ग्रामीण भागातील मोकळ्या मैदानांमध्ये नायलॉन दोऱ्याचा वापर करून पतंगबाजी करणाऱ्यांवर ड्रोनच्या सहाय्याने करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस दलाच्या जा.क्र. ०४/प्रेसनोट/२०२६ मध्ये देण्यात आली आहे. यापूर्वी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सध्या जळगाव, यावल, पारोळा तसेच एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ३९,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नायलॉन मांजामुळे नागरिक, मुक्या प्राण्यांना व पक्ष्यांना गंभीर इजा होऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नायलॉन मांजाचा वापर टाळून केवळ पारंपरिक कापसाच्या दोऱ्याचा वापर करूनच पतंगोत्सव साजरा करावा. नागरिकांनी याबाबत दक्षता घेतल्यास कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळता येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

