Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावमध्ये आज मुख्यमंत्री रोड-शो ; दुपारपासून शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल व...

जळगावमध्ये आज मुख्यमंत्री रोड-शो ; दुपारपासून शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल व तात्पुरते निर्बंध!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचार वातावरण चांगलेच तापले असून आज मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव शहरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. यानिमित्त आयोजित रोड-शोमुळे दुपारी शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल व तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत.मुख्यमंत्र्यांचा रोड-शो दुपारी ३ वाजता कोर्ट चौकातून सुरू होणार असून नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक असा सुमारे १.७ किमीचा प्रवास करत तो शिवतीर्थ मैदानाजवळ समाप्त होणार आहे. सुमारे अडीच तास चालणाऱ्या या रॅलीदरम्यान संबंधित मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुमारे ५०० पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.रोड-शोच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी मार्गाची पाहणी करून रंगीत तालीम घेतली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत सतर्कतेचे आदेशही देण्यात आले.

बस वाहतूक वळवली
चोपडा व यावल दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस टॉवर चौकाऐवजी रिंगरोडमार्गे दूध संघाकडून वळवण्यात येणार आहेत. तसेच आसोदा व भादलीकडील बसेस खेडीमार्गे जुन्या आसोदा रस्त्याने धावतील.

ठिकठिकाणी नाकाबंदी
दुपारी २.३० वाजेपासून स्टेडियम चौकात नाकाबंदी राहणार असून रिंगरोडमार्गे वाहतूक वळवण्यात येईल. फुले मार्केटकडे जाण्यासाठी स्टेट बँक–बालगंधर्व–बीजे मार्केट असा पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोर्ट चौकातही नाकाबंदी असणार असून रिंगरोडकडून येणारी वाहतूक नूतन मराठा कॉलेज समोरील गल्लीतून खान्देश कॉम्प्लेक्स मार्गे रेल्वे स्थानकाकडे वळवली जाईल. तिसरी नाकाबंदी शिवाजीनगर उड्डाणपुलावर राहील. मुख्यमंत्र्यांचा ताफा चित्रा चौक ओलांडल्यानंतरच हा मार्ग पुन्हा खुला करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरवासीयांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या