नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नशिराबाद येथे पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ विविध ठिकाणी उत्साहात पार पडला.नशिराबाद पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार राजेंद्र पाटील, सुनील भावसार, विश्वनाथ महाजन, चंदन पाटील, नितीन नांदुरकर, हरिष पाटील, सुनील महाजन, युनूस शेख, इमरान शेख आदींसह इतर पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत होते. नशिराबाद पत्रकार मंचच्या वतीने हरिष पाटील यांनी आभार व्यक्त केले.
नशिराबाद नगरपरिषद नगरसेवक पंकज महाजन व नगरसेविका सौ. लीना महाजन यांच्या हस्ते पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार..
नशिराबाद नगरपरिषदेचे नवनियुक्त नगरसेवक पंकज महाजन व नगरसेविका सौ. लीना महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी नशिराबाद येथील सर्व पत्रकारांचा सत्कार करून भेटवस्तू देत गौरव केला. पत्रकार बांधव एकजुटीने संघटितपणे काम करीत असल्याने आनंद होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. नशिराबाद पत्रकार मंचतर्फे विश्वनाथ महाजन यांनी आभार मानले.
मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या हस्ते मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार..
मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या नशिराबाद येथील मनसे संपर्क कार्यालयातही पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन उपस्थित सर्व पत्रकारांचा गौरव करण्यात आला. गावातील विविध समस्यांबाबत निर्भीडपणे आवाज उठवण्याचे कार्य असेच सुरू ठेवावे, असे आवाहन मुकुंदा रोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नशिराबाद पत्रकार मंचतर्फे राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

