जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अँड फाइन आर्ट्स विभागातर्फे “शास्त्रीय नृत्याचा गौरवशाली वारसा” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत शास्त्रीय नृत्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. सुचेता भिडे चापेकर यांनी कला व शिक्षण हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून शास्त्रीय नृत्याला पुरातन काळापासूनचा समृद्ध इतिहास आहे. शास्त्रीय नृत्यातून उज्ज्वल करिअर घडू शकते, असे प्रतिपादन केले.व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी शास्त्रीय संगीत हा भारतीय ज्ञानपरंपरेचा मौलिक वारसा असून विद्यार्थ्यांमध्ये या कलेविषयी आवड निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी कला म्हणजेच जीवनशैली असून शास्त्रीय नृत्याला भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, असे नमूद केले.

उद्घाटन सत्रानंतर नृत्यशास्त्र अभ्यासिका डॉ. स्वाती दैठणकर यांनी “भरतनाट्यम” या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात डॉ. प्रीतिलेखा चौधरी यांनी “ओडिसी” नृत्यप्रकारावर सखोल माहिती दिली. चौथ्या सत्रात मुरलीमोहन कालवा यांनी विविध शास्त्रीय नृत्यप्रकारांवर तर पाचव्या सत्रात डॉ. जयंत शेवटेकर यांनी मार्गदर्शन केले.सिनेट सदस्या व परिषदेच्या संयोजक नेहा जोशी यांनी प्रास्ताविकातून परिषदेची भूमिका मांडली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नितीनजी झाल्टे, पवित्रा पाटील, सुरेखा पालवे, दीपक पाटील, अमोल मराठे, भानुदास येवलेकर, स्वप्नाली काळे, प्रशालेचे संचालक प्रा. डॉ. राम भावसार, परिषदेच्या सचिव सुचिता लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.


