Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमचार हजारांची लाच घेताना जामनेरचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

चार हजारांची लाच घेताना जामनेरचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जामनेर | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- जामनेर तालुक्यातील महसूल प्रशासनातील लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सातबारा उताऱ्यावर नावे लावण्यासाठी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी वसीम राजू तडवी (वय २७) याला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या तडवी याने तक्रारदार व त्यांच्या पत्नीच्या नावाने सातबारा उताऱ्यावर तसेच अधिकार अभिलेखात फेरफार नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने १६ डिसेंबर २०२५ रोजी जामनेर शहरालगत दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते. त्यानंतर संबंधित नोंदी करण्यासाठी तलाठी तडवी याने लाचेची मागणी केल्याने, तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने केलेल्या पडताळणीत तडवी याने पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर चार हजार रुपयांवर व्यवहार ठरला. बुधवारी सापळा रचून तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना तडवी याला रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या पथकातील बाळू मराठे, भूषण पाटील यांनी यशस्वी केली.

दरम्यान, जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नुकतेच रावेर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह खासगी पंटरला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील (५१) व पंटर भास्कर रमेश चंदनकर (४३, दोघे रा. खानापूर, ता. रावेर) यांच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तक्रारदाराच्या वडिलांवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई न करण्यासाठी पाटील यांनी १२ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले होते.जामनेर व रावेर येथील या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या