Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनाशिकमध्ये २४ लाखांचे ‘अम्फेटामाइन’ जप्त; छावणी परिसरात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, तिघे पोलिस...

नाशिकमध्ये २४ लाखांचे ‘अम्फेटामाइन’ जप्त; छावणी परिसरात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, तिघे पोलिस कोठडीत

नाशिक-नाशिकरोड | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरासह जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीत आता थेट लष्करी छावणीच्या उंबरठ्यावरच नशेचा साठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. देवळाली कॅम्प येथील लष्करी छावणीच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या कॅथे कॉलनीत पोलिस व अमली पदार्थ विरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे २४ लाख रुपयांचे ‘अम्फेटामाइन’ जप्त करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे अंमलदार राजेंद्र गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुन्ना कल्लू कोल (४०), शांती मुन्ना कोल (३३) व अमर मुन्ना कोल (१९, तिघेही रा. सतना, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही मजुरीचे काम करत असून मागील काही महिन्यांपासून देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास होते.
गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलिस व एनडीपीएस पथकाने संयुक्त कारवाई केली. संशयितांच्या लेबर रूममध्ये छापा टाकल्यानंतर गांजासह पांढऱ्या रंगाच्या चौकोनी कागदात गुंडाळून ठेवलेला ‘अम्फेटामाइन’ हा अमली पदार्थ आढळून आला.

लष्करी छावणीच्या अगदी प्रवेशद्वारासमोरच इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. काही जवानांपर्यंत हे अमली पदार्थ पोहोचल्याचा संशय असून, याबाबत लष्करातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर गोपनीय तपास करून ही कारवाई करण्यात आली. सध्या या ड्रग्ज रॅकेटचे आणखी धागेदोरे शोधण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

‘अम्फेटामाइन’ म्हणजे काय?
‘अम्फेटामाइन’ हे केंद्रीय मज्जासंस्थेला उत्तेजन देणारे औषध असून त्यामुळे सतर्कता व ऊर्जा वाढते. मात्र त्याचा गैरवापर केल्यास तीव्र व्यसन, मानसिक अस्थिरता व गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या