नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील पेठ भागात काल मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर उभी असलेली दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद पेठ भागातील रहिवासी नारायण धनगर हे मिस्तरी काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दिनांक १४ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता ते नेहमीप्रमाणे कामावरून घरी आले. त्यांनी आपली हिरो होंडा कंपनीची HF डिलक्स दुचाकी (क्रमांक MH-19 BA-2649) घरासमोरील अंगणात लावून रात्रीचे जेवण करून झोपले असता मध्यरात्री दरम्यान, रात्री अचानक बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता घराबाहेर उभी असलेली दुचाकी पेटलेली दिसून आली. तात्काळ बाहेर येत त्यांनी पाणी टाकून आग विझवली. त्यावेळी गाडीच्या शेजारी चपला व कापड ठेवून त्यावर पेट्रोल ओतून दुचाकी जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून दुचाकी पेटवणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मागील काही दिवसांपूर्वीही असाच एक मोटरसायकल जाण्याचा प्रयत्न पेठ भागात घडला होता.

