नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरातील नशिराबाद–भुसावळ बायपास रोडलगत असलेल्या शेतात एका तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना अन्नपूर्णा हॉटेलच्या बाजूला, रोडलगत असलेल्या शेतात घडली. मृत तरुणाचे नाव शेख शब्बीर शेख साबीर (उर्फ डॉन), वय ३६ वर्षे, रा. शाहवाडा, नशिराबाद असे आहे. रात्रीच्या सुमारास स्थानिक नागरिकांना शेतात झाडाला लटकलेला मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ नशिराबाद पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे नशिराबाद परिसरात शोककळा पसरली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे.

