Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeक्राईमचाळीसगाव: अवैध गोमांस विक्रीवर कारवाईदरम्यान पोलिस पथकावर हल्ला ; सात जखमी

चाळीसगाव: अवैध गोमांस विक्रीवर कारवाईदरम्यान पोलिस पथकावर हल्ला ; सात जखमी

चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे अवैधरित्या गोमांस विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांसह पोलिस पथकाने छापा टाकला असता, कारवाईदरम्यान पोलिस व पंचांवर दगडफेक करण्यात आल्याची गंभीर घटना शुक्रवारी सकाळी घडली. या हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिकांसह सात जण जखमी झाले असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोलिस हवालदार रविंद्र रावते, संदीप ईश्वर पाटील तसेच पोलिस कॉन्स्टेबल संदीप पोपट पाटील यांच्या पथकाने गोरक्षकांसोबत पिंपरखेड येथे छापा टाकला. तपासादरम्यान त्या ठिकाणी अवैधरित्या गोमांस विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले. कारवाई सुरू असतानाच काही जणांच्या टोळक्याने अचानक पोलिस पथक, पंच व साक्षीदारांवर विटा व दगडांचा हल्ला केला. या हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोलिस हवालदार रविंद्र रावते, संदीप ईश्वर पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संदीप पोपट पाटील यांच्यासह नीलेश भिकन पवार, सिद्धार्थ दिलीप मोरे (दोघेही रा. पिंपरखेड) आणि नितीन शेलार असे एकूण सात जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने चाळीसगाव येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकरणी ईस्त्राइल भिकन कुरेशी (वय ३५) व शेख भिकन कुरेशी (वय ४६, दोघेही रा. पिंपरखेड) या गोमांस विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिस शिपाई संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस व पंचांवर हल्ला करणाऱ्या टोळक्यांविरुद्धही स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांची धरपकड केल्याची माहिती असून पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या