उत्तर महाराष्ट्र–मराठवाडा थेट जोडणाऱ्या प्रकल्पाला गती
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मध्य रेल्वेच्या विस्तृत जाळ्यामुळे देशपातळीवर ओळख निर्माण झालेल्या जळगाव जिल्ह्याच्या रेल्वे नकाशावर आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. जळगाव–जालना या नव्या रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना थेट जोडणारा कमी अंतराचा दुवा उपलब्ध होणार असून, याच प्रकल्पातून जळगाव जिल्ह्यात भादली हे पाचवे जंक्शन स्थानक म्हणून उदयास येणार आहे.भुसावळ जंक्शनमुळे जळगाव जिल्ह्याला आधीच राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळाली आहे. त्यासोबतच जळगाव, चाळीसगाव आणि पाचोरा ही जंक्शन स्थानके प्रवासी व मालवाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. आता जळगाव–जालना या प्रस्तावित १७४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गामुळे जळगाव–भुसावळ दरम्यानचे भादली स्थानक जंक्शनमध्ये रूपांतरित होणार असल्याने जिल्ह्याच्या रेल्वे महत्त्वात लक्षणीय वाढ होणार आहे.
सध्या उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्याकडे जाण्यासाठी मनमाडमार्गे मोठ्या वळणाचा प्रवास करावा लागतो. नव्या मार्गामुळे हा प्रवास अधिक थेट व जलद होणार असून, वेळ आणि खर्च दोन्हीमध्ये बचत होईल. जळगावमार्गे गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवासी तसेच मालगाड्यांना आंध्र प्रदेशासह संपूर्ण दक्षिण भारताशी अधिक सोपा रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे.या मार्गाचा लाभ धार्मिक व पर्यटन क्षेत्रालाही होणार आहे. जालना जिल्ह्यातील राजूर येथील धार्मिक स्थळ तसेच जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. थेट रेल्वे संपर्कामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भादली स्थानक जंक्शन झाल्यानंतर परिसराचा सर्वांगीण विकास अपेक्षित असून, बाजारपेठा, दळणवळण सेवा, हॉटेल व्यवसाय, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता आहे. भादली परिसरात कार्यरत असलेला ओरिएंट सिमेंट प्रकल्प तसेच कृषी उत्पादनांसाठी जलद मालवाहतूक शक्य होणार असल्याने शेतकरी व व्यापारी वर्गालाही मोठा फायदा होणार आहे.यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे. सुमारे ७१०६ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, जळगाव जिल्ह्यात प्राथमिक कामांची तयारी सुरू झाली आहे.एकूणच, जळगाव–जालना रेल्वे मार्ग हा केवळ दळणवळणाचा प्रकल्प न राहता, भादली जंक्शनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक व सामाजिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

