नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदाही सर्वसमावेशक स्वरूपात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने दि. १९ फेब्रुवारी रोजी शहरातील नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व युवकांना सहभागी करून घेण्यासाठी खास सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असून, यामध्ये शिवगीतांवर आधारित नृत्य सादरीकरण, शिवभक्तीपर गीतगायन कार्यक्रम तसेच घरोघरी रांगोळी स्पर्धेचा समावेश आहे. शिवजयंतीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमांचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. सदर कार्यक्रम फ्रुट सेल चौक, नशिराबाद येथे सायंकाळी ६ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून, नशिराबादकरांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव घेता येणार आहे.
दरम्यान, या उत्सवासाठी सर्वसमावेशक शिवजयंती उत्सव समितीची घोषणा करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सुनील महाजन, उपाध्यक्षपदी ललित मराठे, सचिवपदी राकेश पाटील तर खजिनदार म्हणून भूषण (राजू) पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच हरीश पाटील, विश्वनाथ महाजन सर, पवन शर्मा, चंदन पाटील, सागर मोरे, तुषार रंधे व मयूर महाजन हे सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
शिवजयंती उत्सवात नशिराबाद शहरातील नागरिक, युवक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

