चाळीसगाव-मेहुणबारे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दस्केबर्डी गावातील सरपंच व उपसरपंच यांना अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा कट उघडकीस आणण्यात मेहुणबारे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून अपघातासाठी वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर उर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे (उपसरपंच, रा. दस्केबर्डी, ता. चाळीसगाव) यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला रोड अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.फिर्यादी ईश्वर अहिरे (उपसरपंच) व भगवान उत्तम देवरे (सरपंच, दस्केबर्डी) हे २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री चाळीसगावहून बुलेट मोटारसायकलवरून दस्केबर्डीकडे जात असताना शिदवाडी शिवारात मेहुणबारे-शिदवाडी मार्गावर समोरून आलेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघेही खाली पडले असून सरपंच भगवान देवरे गंभीर जखमी झाले होते. या घटनेबाबत फिर्यादी यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
फिर्यादीच्या संशयानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासाचे आदेश दिले. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित पिकअप वाहनाचा शोध घेत वाहन मालकास ताब्यात घेतले.सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. दस्केबर्डी गावातील राजकीय वैमनस्यातून आरोपींनी कट रचून अपघाताचा बनाव करून सरपंच व उपसरपंच यांना पिकअप वाहनाने समोरून धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. या प्रकरणी भीमराव पांडुरंग रोकडे, सचिन भीमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी (सर्व रा. दस्केबर्डी) तसेच लक्ष्मण अशोक महाजन (रा. वाडे, ता. भडगाव – पिकअप वाहन मालक) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान अपघातातील वाहन जप्त करण्यात आले असून सुरुवातीस लावलेली अपघाताची कलमे कमी करून फौजदारी कट रचून खुनाचा प्रयत्न केल्याची गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.
ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ किशोर पाटील, शांताराम पवार, सचिन निकम, पोना योगेश पाटील, पोको विनोद बेलदार व पोका संजय लाटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोका संजय लाटे करीत आहेत

