अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : – महिलांमध्ये आढळणारा गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा गंभीर आजार असून योग्य वेळी एचपीव्ही (HPV) लसीकरण केल्यास तो टाळता येऊ शकतो. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यभर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभाग, जळगाव यांनी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, (१४ ते १५ वर्ष) वयोगटातील मुलींना ही लस देणे अत्यंत आवश्यक आहे. ही लस घेतल्यामुळे मुलींना भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून आयुष्यभर संरक्षण मिळू शकते.सदर लस पूर्णपणे सुरक्षित असून ती जागतिक स्तरावर प्रमाणित आहे. शासनामार्फत ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून पात्र मुलींनी नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक माध्यमांवर या लसीबाबत काही चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही निराधार गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.गावातील सर्व पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे आणि या जनहिताच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गौरव जाधव यांनी केले आहे. तसेच मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच जळगाव जिल्ह्याची खरी संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.

