सावदा (ता. रावेर) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहर परिसरात गोवंशाची अत्यंत अमानुष व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीविरुद्ध सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत.या कारवाईत सात गोवंशांसह बोलेरो पिकअप वाहन असा सुमारे ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्र. एमएच ३९ सी ७३०५) मधून गोवंशाची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याची खात्री झाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वाहन अडवले.तपासणीदरम्यान वाहनामध्ये सात गोवंशांना अत्यंत क्रूरपणे कोंबून ठेवण्यात आले असल्याचे समोर आले. संबंधित जनावरांचे हात-पाय व गळे दोऱ्यांनी घट्ट बांधण्यात आले होते. तसेच त्यांना ना पुरेशी जागा देण्यात आली होती, ना चारा-पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. प्राथमिक तपासात या गोवंशांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आवेश असलम शेख (वय २५, रा. गौसीयानगर, सावदा) याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. तर सलीम पठाण (रा. फैजपूर) व शफीक व्यापारी (रा. वरणगाव) हे दोघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.संबंधित आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेले गोवंश सुरक्षित असून त्यांच्या देखभालीसाठी त्यांना तातडीने गौशाळेत हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संजीव चौधरी करीत आहेत.

