Tuesday, March 17, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद-जळगाव सिटी बस सेवा तात्काळ सुरू करा : नागरिकांची एकमुखी मागणी

नशिराबाद-जळगाव सिटी बस सेवा तात्काळ सुरू करा : नागरिकांची एकमुखी मागणी

विद्यार्थी, कामगार आणि रुग्णांची वाढती गैरसोय!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद ते जळगाव या महत्त्वाच्या मार्गावर नियमित सिटी बस सेवा सुरू करण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिक, विद्यार्थी, कामगार तसेच विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वाढती लोकसंख्या आणि जळगाव शहरावर असलेले शैक्षणिक, वैद्यकीय व रोजगाराचे अवलंबित्व लक्षात घेता ही सेवा तातडीने सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

नशिराबाद व आसपासच्या भागातील शेकडो विद्यार्थी दररोज उच्च शिक्षणासाठी जळगाव येथे प्रवास करतात. याशिवाय अनेक कामगार व नोकरदार वर्गालाही रोज शहरात जावे लागते. मात्र, उपलब्ध खासगी वाहतूक व्यवस्था अपुरी व अनियमित असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या भाड्यामुळे आर्थिक ताणही वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागतो. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, तर विद्यार्थ्यांना वेळेत शाळा व महाविद्यालयात पोहोचणे कठीण होत आहे. रुग्णांना तातडीने उपचारासाठी जळगावला नेण्यासाठीही परवडणारी आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.

स्थानिकांच्या मते, ठराविक वेळापत्रकानुसार सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा वेळी बसच्या नियमित फेऱ्या सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, कामगारांचे वेळेचे नियोजन सुलभ होईल आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुसूत्रता येईल.दरम्यान, या मागणीसाठी नागरिक, व्यापारी संघटना, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते लवकरच संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने निर्णय घेतल्यास नशिराबाद–जळगाव परिसराच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या