Saturday, September 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याAPI योगीता नारखेडे यांना प्रतिष्ठेचा ‘लोकमत खानदेश रत्न’ पुरस्कार जाहीर ; धाडसी...

API योगीता नारखेडे यांना प्रतिष्ठेचा ‘लोकमत खानदेश रत्न’ पुरस्कार जाहीर ; धाडसी कारकिर्दीला मानाचा सलाम

गुन्हेगारीविरोधातील कठोर लढा आणि ७९ अपहृत मुलींची सुटका ; महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायी उदाहरण

नशिराबाद | मुख्य संपादक चंदन पाटील | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगीता मधुकर नारखेडे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘लोकमत खानदेश रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.गुन्हेगारीविरोधातील कठोर भूमिका, तांत्रिक तपासातील प्रावीण्य आणि मानवी दृष्टिकोनातून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान बहाल करण्यात येत आहे.लहानपणापासूनच शिस्त, परिश्रम आणि राष्ट्रसेवेचे संस्कार लाभलेल्या योगीता नारखेडे यांनी शिक्षणातही उल्लेखनीय कामगिरी केली.अर्थशास्त्र विषयात पदवी शिक्षण पूर्ण करताना त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर पोलीस सेवेत प्रवेश करण्याचे स्वप्न साकार करत त्यांनी २०१२ मध्ये नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत कठोर प्रशिक्षण पूर्ण केले.

२०१३ मध्ये सेवेत रुजू झाल्यानंतर नाशिक शहरात ‘डिटेक्शन’ विभागात त्यांनी विशेष कामगिरी बजावली. घरफोडी, वाहन चोरी आणि साखळी चोरीसारख्या गुन्ह्यांचा बारकाईने तपास करत त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. गुन्हेगारांविरोधात ठोस पुरावे गोळा करून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षा होईल याची दक्षता घेतली.यानंतर मुंबई येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात सहभाग घेतला. गुन्हे उघडकीस आणताना त्यांनी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केला. अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करत गुन्हेगारीविरोधात ठोस संदेश दिला.

२०२१ मध्ये जळगाव येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात (AHTU) कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेणे हे अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. देशातील विविध भागांत छापे टाकत त्यांनी तब्बल ७९ मुलींची सुटका केली. तसेच देहविक्रीच्या विळख्यात अडकलेल्या महिलांचीही मुक्तता करून त्यांना नवजीवन मिळवून दिले.

२०२३ मध्ये कासोदा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी ग्रामीण भागात प्रभावी प्रशासन उभे केले. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. सध्या नशिराबाद येथे कार्यरत असताना त्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत.

त्यांच्या आतापर्यंतच्या सेवाकाळात त्यांना १०० हून अधिक रोख पारितोषिके आणि अनेक प्रशंसापत्रे प्राप्त झाली आहेत. त्यांच्या कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून महिला अधिकाऱ्यांविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे.धाडस, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा यांचा संगम असलेल्या योगीता नारखेडे यांना जाहीर झालेला ‘लोकमत खानदेश रत्न’ पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा योग्य गौरव मानला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या