Tuesday, March 17, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळात मोठी कारवाई : बसस्थानक परिसरातून गावठी पिस्तुलासह संशयित अटकेत

भुसावळात मोठी कारवाई : बसस्थानक परिसरातून गावठी पिस्तुलासह संशयित अटकेत

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस  दक्षता लाईव्ह :- शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ठोस कारवाई करत बसस्थानक परिसरातून एका संशयितास गावठी पिस्तुलासह अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या निर्देशानुसार शहरात अवैध शस्त्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने संशयितांवर गुप्तपणे नजर ठेवण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानक गेटलगत रिक्षा स्टँड परिसरात एक व्यक्ती पिस्तुलासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शादाब रईस कुरेशी (वय ३५, रा. भोपाल, मध्यप्रदेश) असे असून त्याच्याकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल व मॅगझीन जप्त करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौकशीत आरोपी हा मध्यप्रदेशातील भोपाल येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भोपाल येथील अशोका गार्डन परिसरात गोळीबाराच्या घटनेत त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

भुसावळ पोलिसांनी या अटकेची माहिती संबंधित भोपाल पोलिसांना दिली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर करीत असून डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या