शिरपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- किसान विद्या प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, बोराडी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील यांनी औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत Brilliants Publication तर्फे “Pharmaceutical Organic Chemistry” हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सदर पुस्तक फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या अभ्यासक्रमानुसार बी. फार्मसी प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून याकडे पाहिले जात आहे.
डॉ. पाटील यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये एकूण ४२ संशोधन निबंध प्रकाशित झाले असून त्यापैकी २९ राष्ट्रीय व १३ आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी ५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या संशोधन लेखांना ७५१ संशोधन लेखांमध्ये उद्धरण (Citation) मिळाले असून त्यांचा संचयी इम्पॅक्ट फॅक्टर १०, एच-इंडेक्स १९ व आय-१० इंडेक्स २९ इतका आहे. त्यांच्या नावावर ४ भारतीय पेटंट व १ यूके डिझाईन पेटंटही नोंद आहे.ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे ३० पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे व ४ पीएच.डी. संशोधकांचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
याशिवाय ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणूनही कार्य पाहत आहेत.सध्या ते Science Alert International Journals या पाच आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे तांत्रिक संपादक असून Red Flower Publication, नवी दिल्ली तर्फे प्रकाशित होणाऱ्या JPMC या राष्ट्रीय जर्नलच्या सल्लागार संपादकीय मंडळावर सदस्य आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ४० संशोधन पत्रे सादर केली आहेत.त्यांना डॉ. व्ही. आर. पाटील, डॉ. एस. एस. राजपूत व डॉ. एस. डी. ब-हाटे यांचे मार्गदर्शन लाभले असून कॉलेज ऑफ फार्मसी, फैजपूरचे प्राचार्य डॉ. आर. वाय. चौधरी यांचेही सहकार्य लाभले आहे.डॉ. पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक वसंत पुरुषोत्तम पाटील व माजी मुख्याध्यापिका सौ. हिराबाई पाटील यांचे सुपुत्र असून त्यांच्या या यशाबद्दल सावदा परिसरासह जळगाव जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, उपसरपंच राहुल रंधे, चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहित रंधे, उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार वाघ तसेच महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

