आयपीएलच्या धर्तीवर मेहरुण येथे T-20 स्पर्धा; कान्हदेशातील खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचे व्यासपीठ
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- क्रिकेटप्रेमी जळगावकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ चे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केली.यावेळी व्यासपीठावर अड. सुरज जहागिर, उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे व खजिनदार राजेंद्र लढ्ढा उपस्थित होते.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या धर्तीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील ‘जैन ड्रीम स्पेसेस’ क्रीडांगणावर सामने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे.
“Own The Game, Lead The League, Build Legacy” या घोषवाक्याखाली होणारी ही लीग जळगावसह संपूर्ण कान्हदेशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी देणार आहे. स्पर्धा पांढऱ्या लेदर बॉलवर खेळविण्यात येणार असून रंगीत पोशाखात दिवस-रात्र सामने रंगणार आहेत.
स्थानिक खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी, क्रिकेटचा दर्जा उंचावावा आणि जळगावच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी हा या लीगचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले. जळगाव क्रिकेट लीग ही केवळ स्पर्धा नसून क्रिकेटचा उत्सव ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या खेळाडूंनाच नोंदणीनंतर सहभाग घेता येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026 (पर्व 2) : सविस्तर माहिती
JCL 2026 T-20 क्रिकेट (पर्व 2)स्पर्धा :
जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 हे स्थानिक स्तरावरील एक भव्य T-20 क्रिकेट पर्व असून यंदा “पर्व 2” म्हणून अधिक नियोजनबद्ध व स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. आयपीएलच्या धर्तीवर ही लीग राबविण्यात येत असल्याने संघरचना, खेळाडू निवड, सामने आणि व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये व्यावसायिकता दिसून येणार आहे. जळगाव व संपूर्ण कान्हदेशातील क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर चमकण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.
स्पर्धेचे आयोजक :
ही स्पर्धा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केली जात आहे. स्थानिक क्रिकेटचा दर्जा उंचावणे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि जळगावमध्ये व्यावसायिक क्रिकेट संस्कृती रुजवणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन केले जात आहे.
स्पर्धेचे स्थळ :
स्पर्धेतील सर्व सामने मेहरुण येथील कांताई नगर परिसरातील ‘जैन ड्रीम स्पेसेस’ या सुसज्ज क्रीडांगणावर खेळविण्यात येणार आहेत. मैदानाची सुविधा, प्रेक्षकांसाठी व्यवस्था आणि खेळाडूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा लक्षात घेऊन हे स्थळ निवडण्यात आले आहे. या मैदानावर दिवस आणि रात्री दोन्ही वेळचे सामने खेळवता येणार असल्याने प्रेक्षकांना अधिक रोमांचक अनुभव मिळणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप :
स्पर्धा T-20 (२० षटकांची) स्वरूपात खेळवली जाणार असून आयपीएलप्रमाणे संघरचना, सामने, गुणतालिका आणि बाद फेरी (नॉकआऊट) पद्धतीचा अवलंब केला जाईल. प्रत्येक संघात निवडक व नोंदणीकृत खेळाडूंनाच संधी दिली जाईल. यामुळे स्पर्धेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
स्पर्धेचे वैशिष्ट्ये :
या लीगची खास वैशिष्ट्ये म्हणजे पांढऱ्या लेदर बॉलचा वापर, खेळाडूंसाठी रंगीत जर्सी आणि दिवस-रात्र सामने. त्यामुळे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व आयपीएलसारखा लुक मिळणार आहे. प्रकाशझोतात होणारे सामने, आकर्षक वातावरण आणि स्पर्धात्मक खेळ यामुळे प्रेक्षकांसाठी हा क्रिकेटचा खरा उत्सव ठरणार आहे. तसेच स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याचा अनुभव मिळणार आहे
“आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा!”
नव्या जोशासह सज्ज होत असलेल्या या लीगमुळे खेळाडूंना खेळाचा आणि व्यावसायिकांना व्यवसायाचा नवा मंच उपलब्ध होणार असून जळगावच्या क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होणार आहे.

