नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील गजबजलेल्या साथी बाजार परिसरात दुचाकी चोरीची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अजिंक्य महिला मंडळ परिसरातून मध्यरात्री घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची बाब समोर आली असून, याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी यश खेमराज पाटील यांनी आपली दुचाकी (क्र. MH 19 DL 5868) १९ मार्चच्या रात्री घरासमोर उभी केली होती. दरम्यान, २० मार्च रोजी पहाटे २ ते ५ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने संधी साधत वाहन लंपास केले. सकाळी दुचाकी जागेवर नसल्याचे लक्षात येताच परिसरात शोधाशोध करण्यात आली; मात्र कोणताही ठोस मागोवा लागला नाही.घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः गर्दीच्या भागातूनही चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

